खानापूर नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष रफिक खानापूरी यांचे सुपुत्र मजहर रफिक खानापुरी यांची तर उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी अंकलगी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सर्वच नगरसेवकांनी घेतला होता. त्यानुसार मजहर खानापूरी यांची अविरोध निवड झाली. आज बुधवारी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 17 चे मजहर खानापूरी तर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 4 च्या लक्ष्मी बसलिंग अंकलगी यांनी अर्ज दाखल केले होते.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विरोधात अर्ज दाखल न झाल्यामुळे या उभयतांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षपद सामान्य गटासाठी तर उपनगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. अनुसूचित जातीच्या लक्ष्मी अंकलगी या एकमेव उमेदवार होत्या.
खानापूर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध व्हावी यासाठी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि खानापूरचे आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. प्रारंभी नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून दोन गट पडले होते. परंतु पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मध्यस्थी करून दोन्ही गटाशी संवाद साधला. तसेच शहर विकासासाठी निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी गटबाजी न करता एक मताने नगराध्यक्षांची निवड करण्याचा निर्णय घेतला.
नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नारायण मयेकर हेदेखील इच्छुक होते. नूतन नगराध्यक्ष आणि उपरण उपनगराध्यक्ष यांची निवड जाहीर होताच त्यांच्या समर्थक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.