बेळगावमध्ये या ना त्या कारणाने मराठी भाषिकांना त्रास दिला जातो. कधी सरकारी कार्यालयात कन्नडसक्ती तर कधी सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडून अरेरावीच्या जोरावर होणारी कन्नड सक्ती. प्रशासनाच्यावतीने सातत्याने नवनव्या युक्त्या कन्नडसक्तीसंदर्भात लढविण्यात येतात.
शहारातील अनेक आस्थापनांच्या नामफलकावर कन्नडमध्ये मजकूर असावा, यासंदर्भात काही दिवसांमागे प्रशासनाने फतवा काढला होता. त्यानंतर ही कन्नड सक्तीची मोहीम थंडावली होती. परंतु आज अचानक या कन्नडसक्तीची जाग मनपाला आली आहे.
शहरातील उत्तर भागात आज मनपाच्या कामगारांनी अनेक आस्थापनांना भेट देऊन या आस्थापनांचे नामफलक कन्नडमध्ये लावण्यासंदर्भात सूचना केली आहे. नामफलकावर सर्वात मोठ्या अक्षरात कन्नडमध्ये आस्थापनाचे नाव असावे, यासोबतच इंग्रजी आणि इतर भाषा या लहान आकारात दर्शविण्यात यावे, अशा पद्धतीच्या सूचना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आस्थापन मालकांना केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी आस्थापनांच्या नामफलकावर कन्नड भाषेत ठळक अक्षरात नाव दर्शविण्यासाठी एक परिपत्रक जारी केले होते.
त्यानंतर यासंदर्भात कोणत्याही प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली नव्हती. परंतु आज अचानकपणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील उत्तर भागातील आस्थापनांना भेट देऊन नामफलक कन्नड भाषेत ठळक अक्षरात, म्हणजेच ९५ टक्के नामफलक हा कन्नड भाषेत असण्यासंबंधी सूचना केली आहे. तसेच या आस्थापन मालकांचे नाव आणि मोबाईल क्रमांकही नोंद करून घेण्यात आले आहेत.
राज्य सरकारने नुकतीच मराठा विकास प्राधिकरण स्थापनेची घोषणा केली आहे. यानंतर अनेक कन्नड संघटना आणि कर्नाटकातील काही राजकीय नेतेमंडळींनी या प्राधिकरणाला विरोध दर्शविला आहे. याचाच भाग म्हणून ही कन्नड सक्ती करण्यात येत आहे का? बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिकांच्या व्यवसायांचा समावेश आहे.
हेतुपुरस्सर आणि पुन्हा भाषिक तेढ निर्माण करून सामाजिक शांतता बिघडविण्यासाठी कन्नडसक्तीचा बडगा उगारण्यात आला आहे का? अशी चर्चा आता सीमाभागात रंगू लागली आहे.