स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या अनगोळ येथील मुख्य रस्त्याचे कामकाज सुरु आहे. यामुळे अनगोळ येथे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसची वाहतूक ही भाग्यनगरमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान २८ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरून निघालेल्या तनय मनोज हुईलगोळ या विद्यार्थांचा भाग्यनगर तिसरा क्रॉस येथे बसखाली सापडून मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांच्या मृत्त्यूला रहदारी विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
या रस्त्यावर गतिरोधकांची कमतरता आहे. भाग्यनगर येथील रहिवाशांनी याठिकाणी गतिरोधक बसविण्यासाठी ३१ मे २०२० रोजी दक्षिण विभाग रहदारी पोलीस स्थानकाकाकडे अर्ज केला होता. रहदारी विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरने या अर्जाकडे दुर्लक्ष केले. परिणामी आजतागायत याठिकाणी गतिरोधक बसविण्यात आला नाही. आणि भरधाव येणाऱ्या बसमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कामाच्या तक्रारी स्मार्ट सिटी कामकाज सुरु झाल्यापासून पुढे येत आहेत. अनेकवेळा अनेक विभागातील नागरिकांनी या कामाबद्दलची त्रुटी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु याकडे अधिकारी वर्गाने डोळेझाक केल्याची तक्रार नागरिक करत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेली कामे कोणत्याही पद्धतीचे ताळतंत्र नसलेली असून या कामामुळे विविध ठिकाणी अपघात झाले आहेत. काही ठिकाणी अर्धवट स्थितीत कामे रखडली गेली आहेत.
खोदकाम, धुळीचे साम्राज्य यामुळे बेळगावकर पुरते हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असलेल्या खोदकामामुळे वाहन पलटी झाल्याचे प्रकारही घडले आहेत. रस्त्यांचे कामकाज करताना तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या कामांमुळे नागरिकांना याचा फटका बसत आहे शिवाय पैशाचा चुराडाही होत आहे.
त्यातच शनिवारी झालेल्या अपघातात एका निष्पाप विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला असून, यासाठी रहदारी पोलीस विभाग आणि स्मार्ट सिटी योजना कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यासोबतच स्मार्ट सिटी योजना आणखी किती जणांचे बळी घेणार आहे? असा संतप्त सवालही नागरिक विचारत आहेत.