जगातील 1 लाख वैज्ञानिकांमध्ये बेळगांव येथील प्राध्यापक डॉ. एस. के. कुलकर्णी यांना जागतिक स्तरावर 132 वे मानांकन मिळाले असून फार्माकोलॉजी क्षेत्रात भारतामध्ये ते पहिला क्रमांकाचे शास्त्रज्ञ ठरले आहेत. तमाम बेळगावकरांसह समस्त भारतवासियांसाठी अत्यंत अभिमानास्पद अशी ही बाब आहे.
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठ आपल्या सर्वेक्षण आणि इंडेक्स सायंटेशन्सच्या आधारे जगभरातील 1,00,000 निवडक वैज्ञानिक अर्थात शास्त्रज्ञांची क्रमवारी जाहीर करत असते. विविध निकषांच्या आधारे ही क्रमवारी लावली जाते. यासाठी वैज्ञानिक क्षेत्रातील 22 आणि सब्जेक्ट कॅटेगिरीमधील 176 निकषांची मदत घेतली जाते.
या क्रमवारीत जागतिक स्तरावर डॉ. एस. के. कुलकर्णी यांनी 132 वा क्रमांक अर्थात मानांकन मिळविले आहे. याव्यतिरिक्त मानांकन क्रमवारीमध्ये फार्माकोलॉजी विभागात भारतातील या क्षेत्रातील वैज्ञानिकांमध्ये ते प्रथम स्थानावर आहेत. फार्माकोलॉजि या क्षेत्रात डॉ. एस. के. कुलकर्णी यांचा अभ्यास आणि संशोधन याला जगभरात मान्यता आहे.
प्राध्यापक डॉ. एस. के. कुलकर्णी यांची शैक्षणिक आणि विद्यापीठीय कारकीर्द अत्यंत गौरवास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 30 विद्यार्थ्यांनी पीएचडी केली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या नावे 5 पेटंट असून पंजाब विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले आहे. निवृत्तीनंतर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी येथेही त्यांनी सेवा बजावली आहे. याव्यतिरिक्त अनेक विद्यापीठात त्यांना मानद प्राध्यापक म्हणून निमंत्रित केले जाते. आजपर्यंत त्यांनी पाचशेहून अधिक शास्त्रीय शोधनिबंध लिहिले आहेत.
जागतिक क्रमवारी तयार करताना डॉ. कुलकर्णी यांचे शोधनिबंध किती जणांनी अभ्यासले? किती जणांनी त्याचा संदर्भ घेतला? याची पाहणी करण्यात आली. या पाहणीत 14 हजारहून अधिक जणांनी त्यांच्या संशोधनाचा व लेखनाचा संदर्भ घेतल्याचे आणि वाचन केल्याचे स्पष्ट झाले आहे. उपरोक्त उल्लेखनीय यशाबद्दल प्राध्यापक डॉ. एस. के. कुलकर्णी यांचे सध्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.