जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेली क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याची तलवार खाली पडल्याने या परिसरात उलटसुलट चर्चांना वेग आला होता. परंतु तात्काळ डीसीपी विक्रम आमटे यांनी याठिकाणी धाव घेऊन संबंधित घटनेचा आढावा घेतला.
बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारानंतर कोर्ट आवार आणि जिल्हाधिकारी आवारात नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. दरम्यान संगोळी रायन्ना चाहत्यांचीही गर्दी झाली. या विषयाची माहिती मिळताच तात्काळ डीसीपी आमटेंनी या प्रकारची चौकशी केली. यादरम्यान अरण्य खात्याच्यावतीने तोडण्यात येत असलेल्या झाडांच्या फांदी पडल्यामुळे क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्यावरील तलवार पडल्याचे उघडकीस आले.
यावेळी रायन्ना समर्थकांनी घडल्या प्रकारामुळे त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. शिवाय याठिकाणी महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रारही त्यांनी केली. क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा पुतळा असलेल्या परिसरात अंधार पसरला असून या परिसराकडे महापालिकेने लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे मत महादेव तलवार यांनी व्यक्त केले.
महागरपालिकेला याविषयी कल्पना देण्यात आली असून या परिसरात योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती डीसीपी विक्रम आमटे यांनी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तात्काळ मार्केट सीपीआय संगमेश शिवयोगी, एसीपी सदाशिव कट्टीमनी आणि डीसीपी विक्रम आमटे यांनी भेट देऊन माहिती घेतली.