शहर आणि परिसरातील सर्व प्रकारच्या रुग्णांची होणारी कुचंबना दूर करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल (बीम्स) मधील ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण विभाग तात्काळ सुरू करण्यात यावा, अशी मागणी फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. परवा मध्यरात्री दोनच्या सुमारास घोटगाळी (ता. खानापूर) येथील एका गर्भवती महिलेला सिव्हिल हॉस्पिटल (बीम्स) मध्ये दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला.
परिणामी रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत थंडीवाऱ्यात हॉस्पिटलच्या व्हरांड्यात पडून राहिल्यामुळे संबंधित गर्भवती महिलेची अवस्था चिंताजनक झाली होती. तथापि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या संतोष दरेकर आणि नवजीवन हॉस्पिटलचे डॉ. सतीश चौलीगर यांच्या प्रसंगावधानामुळे संबंधित गर्भवती महिलेचे आणि तिच्या बाळाचे प्राण वाचू शकले.
त्या गर्भवती महिलेवर जो बिकट प्रसंग ओढवला तसा प्रसंग इतर कोणत्याही प्रकारच्या रुग्णावर ओढवू शकतो. मात्र प्रत्येक वेळी दरेकर यांच्या सारखे कोणी मदतीला धावून येईलच असे नाही. तसे झाल्यास एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. याची गांभीर्याने दखल घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमधील ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण विभाग तात्काळ पूर्ववत सुरू केला जावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी संतोष दरेकर यांच्यासह राहुल पाटील, जयवंत बाळीकेरी आदींसह फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अन्य सदस्य उपस्थित होते.