देश डिजिटल होण्याच्या मार्गावर असताना आणि सर्व व्यवहार डिजिटल माध्यमाद्वारे करण्यात येत असतानाच दुसऱ्या बाजूला या डिजिटल माध्यमात धोक्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. बेळगावमध्ये अशाच हायटेक पद्धतीने दोन इनोव्हा कारची चोरी करण्यात आली आहे.
सदाशिव नगर येथील डॉ. बेल्लद, रामतीर्थनगर येथील अनिल पाटील यांच्या घरासमोरील कार चोरीला गेल्या असून याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या दोन्हीही इनोव्हा कार नव्या कोऱ्या होत्या. दसऱ्याच्या मुहूर्तावर या कारची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर केवळ एक ते दोन फेऱ्या मारून या कार पुन्हा घरासमोरच पार्क करण्यात आल्या होत्या. दरम्यान मोठ्या शिताफीने या दोन्ही कारची चोरी करण्यात आली आहे.
सर्व व्यवहार पेपरलेस होत असताना चोर तरी कसे जुन्या पद्धतीने चोरी करतील? सध्याच्या पेपरलेस जमान्यात हातोडी – रॉड ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कारचे सॉफ्टवेअर हॅक करून या दोन्ही कारची चोरी करण्यात आली आहे.
इनोव्हा कारमधील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लॉक तोडण्यात येऊन चोरट्यांनी कारसहित पोबारा केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून माळमारुती पोलीस याचा तपास करत आहेत.