हलगा -बस्तवाड येथील शेतकऱ्यांनी सुवर्ण विधान सौध इमारतीच्या उभारणीसाठी आपली मोलाची पिकाऊ जमीन देऊ केली असताना आता या भागातील शेतात मशागतीसाठी जाण्या-येण्यासाठी असणारे मार्ग लोखंडी तारांचे कुंपण टाकून बंद करण्यात आल्यामुळे नापसंती व्यक्त होत असून संबंधित लोखंडी तारेचे कुंपण काढून शेतकऱ्यांसाठी मार्ग खुला करून द्यावा, अशी मागणी हलगा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हलगा परिसरातील शेतकऱ्यांनी ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. हलगा ‘बस्तवाड गावासह उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी हलगा गांवातील शेतकऱ्यांनी सुवर्ण विधानसौध इमारतीच्या बांधकामासाठी आपली पिकाऊ जमीन सरकारला देऊ केली. त्याचप्रमाणे सुवर्ण विधानसौध परिसर सोडून आसपासच्या शेतजमिनीतील मशागतीसाठी सर्व्हिस रोड करावा, अशी मागणीही त्यावेळी केली होती.
त्यानुसार सर्व्हिस रोड उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र आता या सर्व्हिस रोडवर लोखंडी तारांचे कुंपण टाकण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील मशागतीसाठी ये – जा करणे कठीण बनले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन सुवर्ण विधानसौध परिसरात मशागतीस जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मार्ग उपलब्ध करून दिला जावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी ॲड. अण्णासाहेब घोरपडे यांच्यासह ॲड. वाय. के. दिवटे, सुभाष मोदगेकर, आर. नलवडे, डी. पी. जेवणी, ॲड. कांबळे, शरद देसाई, रामा कामानाचे, बाहुबली चिकपरप्पा, कृष्णा हणमंताचे, झुंझाप्पा चौगुले, यल्लाप्पा बिळगोजी, शिवाजी सामजी, विजय निलजकर आदींसह हलगा परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.