कर्नाटकात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची चाहूल लागली होती. दरम्यान या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षणाही जाहीर करण्यात आले होते. या पाठोपाठ आता अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
यासंबंधी शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर रोजी बंगळूर उच्च न्यायालयाने तात्काळ निवडणूक तारीख जाहीर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल लागताच ‘बेळगाव लाईव्ह’ ने या निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली होती. आणि या अनुषंगाने आज बंगळूर उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार या निवडणुका नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर महिन्याच्या मध्यावधीत होण्याची दाट शक्यता आहे.
बेळगावच्या राजकारणाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. चुरशीने झालेल्या या निवडणुकांसाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपले नशीब आजमावले होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही अनेक इच्छुक उमेदवारांची रांग निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच लागलेली आहे.
आता प्रतीक्षा आहे ती या निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची. तारीख जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उतरून आपले नशीब आजमावले, हे पाहणे आता पुन्हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.