घरातील देव देवतांचे फुटलेले किंवा अतिरिक्त फोटो कचऱ्यात टाकून देता येत नसल्यामुळे नागरिकांकडून ते सार्वजनिक ठिकाणी झाडाखाली ठेवले जातात. खरेतर ही देखील एक प्रकारे देव-देवतांची विटंबनाच आहे हे लक्षात घेऊन अशा फोटोचा पुनर्वापर करावा अथवा फेसबुक फ्रेंड्स सर्कलशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरात असलेल्या ठराविक झाडांखाली घरातील देव देवतांचे भग्न किंवा अतिरिक्त फोटो आणि झिजलेल्या मूर्ती मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या आढळून येत आहेत. आज रविवारी सकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे व त्यांची मुलगी कु. सुखदा (वय वर्ष 7) नेहमीप्रमाणे व्हॅक्सिन डेपो परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जाऊन परत येत होते. त्यावेळी सुखदा हिला सापडलेल्या एका राधाकृष्णाच्या मूर्तीमुळे बिर्जे यांना एका झाडाखाली ठेवण्यात आलेल्या देव-देवतांच्या अनेक फोटोचा पत्ता लागला.
प्रशांत बिर्जे यांनी आपल्या मुली समवेत आणखी कांही झाड शोधली तर त्या सर्व झाडांखाली सुद्धा जवळपास 30 एक फोटो व देवाच्या मुर्ती ठेवण्यात आल्या होत्या. तेंव्हा त्यांनी लागलीच आपले मित्र फेसबुक फ्रेंडस सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर फोनवर संपर्क साधून माहिती दिली.
दरेकर त्वरित दिनेश कोल्हापुरे या मित्रासह पटकन 2 पोती घेऊन आले आणि त्यासर्वांनी रस्त्यावरील झाडाखालील फोटो व मुर्ती गोळा करून पोत्यात भरून ती जागा स्वच्छ केली. तसेच तेथील भाजी विक्रेत्यांना संग्रहित करून ठेवलेली फोटोंची पोती महापालिका कर्मचाऱ्यांकडे देण्यास सांगितली.
जो माणूस आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करून घेण्यासाठी याच फोटोतील देवांची भक्तिभावानं,श्रद्धेनं पूजा करून आयुष्यभर देव देव करतो
आणि शेवटी फोटो फुटला की तो सरळ घराबाहेर. काय म्हणावं माणसाच्या या श्रद्धेला? आपल्या श्रद्धा स्थानांना अस रस्त्यावर पाहणं खरच वेदनादायी आहे. आपल्या भागात अश्या प्रकारची काही ठिकाण असतील तर कृपया आमच्याशी संपर्क करावा आणि आपल्या घरातील देव देवतांचे फोटो असे रस्त्यावर टाकण्यापेक्षा त्याचा पुनर्वापर करावा किंवा फोटो फ्रेम मेकर्सना द्यावेत, असे आवाहन संतोष दरेकर व मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी केले आहे.