शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वळत असतानाच चारीबाजूनी समस्यांच्या विळख्यात सापडत आहे. कधी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे तर कधी नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे. प्रशासनाच्यावतीने स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जाते. यासाठी सोयीही पुरविल्या जातात. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांच्यावतीने प्रशासनाच्या नावाने बोंब मारली जाते. प्रशासन वेळच्या वेळी सोयी सुविधा उपलब्ध करून देत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत असतात.
हिंदवाडी येथील रानडे कॉलनीमध्ये अशाच पद्धतीचा प्रकार घडून येताना दिसत आहे. रानडे कॉलनी नजीक असलेल्या हॉटेल्स आणि कँटीनचा कचरा रस्त्यावर बिनधास्तपणे फेकून देण्यात आल्यामुळे हा परिसर कचऱ्याने व्यापून गेला आहे. यासंबंधी प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची गरज तर आहेच.
पण त्याचबरोबर येथील हॉटेल मालक आणि कँटीन मालक तसेच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वागणे गरजेचे आहे. दररोज सकाळी पालिकेचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी आपल्या दारात येऊन कचऱ्याची उचल करत असूनही अशा पद्धतीने उघड्यावर कचरा टाकणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न कचरा टाकणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विचारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अशा बेजबाबदार नागरिकांना धडा शिकविण्यासाठी पालिका प्रशासनानेही लक्ष पुरवून अशा नागरिकांवर कारवाई करणेही तितकेच महत्वाचे आहे.
रानडे कॉलनीमध्ये टाकण्यात आलेला हा कचरा हळूहळू रस्त्यावर संपूर्णपणे पसरत चालला असून यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आधीच कोरोनासारख्या सांसर्गिक रोगामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशातच अशा पद्धतीच्या अस्वच्छतेमुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची शक्यता आहे.
याठिकाणी टाकण्यात आलेल्या कचऱ्याची उचल हि एक आठवड्यानंतर केली जाते. परंतु संपूर्ण आठवडाभर अशाचपद्धतीने याठिकाणी कचरा टाकण्यात येतो. आणि दिवसेंदिवस दुर्गंधी वाढत जाते. या प्रकारावर प्रशासनाने लक्ष घालून योग्य वेळेत कचरा उचल करण्याची तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रानडे कॉलनीतील रहिवासी करत आहेत.