बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकारामुळे शहरातील मिरवणूक मार्गावरील डेकोरेटिव्ह लाईट बसविण्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आज शनिवारी सकाळी या मार्गांच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शहरातील चन्नम्मा सर्कल, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, रामलिंग खिंड गल्ली व हेमु कलानी चौक या मिरवणूक मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी नरगुंदकर भावे चौक येथे आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी प्रारंभी चौकातील नरगुंदकर भावे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर विधीवत भूमिपूजन करून कुदळ मारण्याद्वारे मिरवणूक मार्गाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ केला.
याप्रसंगी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, श्री गणेशोत्सव, श्री शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, महावीर जयंती आदी सर्व जयंती मिरवणूकांसाठी बेळगांव शहरातील जो प्रमुख मिरवणूक मार्ग आहे, त्या मार्गावर 1 कोटी 25 लाख रुपये खर्च करून डेकोरेटिव्ह लाईट बसविले जाणार आहेत.
अलीकडेच मी या कामाचे उद्घाटन केले असून लाईट बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता संपूर्ण मिरवणूक मार्गाचे नव्याने डांबरीकरण केले जाणार आहे. आज भूमिपूजनाद्वारे या कामाचा शुभारंभ झाला आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे शहरातील मिरवणूक मार्ग डेकोरेटिव्ह लाईट बसवून सुशोभित केला जाईल आता पाठपुरावा करून डांबरीकरणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे.
एकूणच शहरातील मिरवणूक मार्गावरचा रस्ता चांगला करून डेकोरेटिव्ह लाइट्स बसविले जावेत ही शहरवासीयांची अनेक वर्षांची मागणी आता पूर्ण होणार आहे असे सांगून आगामी काळात शहरातील लहानातील लहान गल्लीतील रस्ता गटारे आणि पाण्याची समस्या दूर केली जाईल, असे आश्वासन आमदार ॲड. बेनके यांनी दिले. भूमिपूजन समारंभप्रसंगी आमदारांच्या समर्थकांसह स्थानिक व्यापारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.