नोटाबंदी आणि त्यानंतर लॉक डाऊनमुळे शहरातील वंटमुरी कॉलनी येथील आश्रय आणि आंबेडकर आवास योजनेअंतर्गत घरांमध्ये राहणाऱ्या गरीब लोकांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. तेंव्हा त्यांनी बँकेकडून काढलेली कर्जे सरकारने माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगांव वैभगड हिंदू बेलपत्तार समाजसेवा अभिवृद्धी संघाने उपरोक्त मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. निवेदन सादर करण्यापूर्वी वंटमुरी कॉलनी येथील आश्रय आणि आंबेडकर आवास योजनेअंतर्गत घरांमध्ये वास्तव्यास असणाऱ्या कुटुंबातील महिला आणि पुरुष यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्याचप्रमाणे यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
वंटमुरी कॉलनी येथील सरकारच्या आश्रय आणि आंबेडकर घरांमध्ये राहणाऱ्या लाभार्थींनी छोटा व्यापार -धंदा सुरू करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी बँकेकडून कर्ज काढले होते. संबंधित कर्जदार वर्षभर आपल्या कर्जाची परतफेड नियमितपणे करत होते. परंतु त्यानंतर नोटाबंदी आली आणि या लोकांच्या व्यापार -धंद्याला फटका बसला.
यातभर म्हणून अलीकडे कोसळलेल्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनच्या संकटामुळे या लोकांचे आर्थिक कंबरडेच मोडले असून त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. सध्या त्यांना एक वेळचे जेवण मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. तेंव्हा त्यांच्या या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या लोकांनी बँकेकडून घेतलेले कर्ज सरकारने माफ करावे अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.