राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पर्यंतच्या सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय चांचण्या मोफत केल्या जाणार असून या योजनेची घोषणा येत्या 1 जानेवारी 2021 रोजी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली आहे.
म्हैसूर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ सुधाकर पुढे म्हणाले की, सरकारी हॉस्पिटल्समध्ये येणाऱ्या रुग्णांना रक्त तपासणीपासून सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्यांसाठी खाजगी प्रयोगशाळेकडे पाठविले जाते. यापैकी कांही प्रयोगशाळांनी सरकारी डॉक्टरांनी संगनमत केले आहे.
सदर गैरप्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी येत्या 1 जानेवारी 2021पासून सरकारी हॉस्पिटल्समध्ये रक्ततपासणी, एमआरआय, सिटीस्कॅन आदी सर्व प्रकारच्या चांचण्या मोफत केल्या जाणार आहेत. त्या करिता जनतेकडून कोणतेही शुल्क आकारू नये, अशी सक्त सूचना सर्व सरकारी हॉस्पिटल्सना देण्यात येईल.
सरकारी हॉस्पिटल पासून 100 मीटर अंतरापर्यंत कोणतीही खाजगी औषध दुकाने असू नयेत. सरकारकडून देण्यात येणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा वापर करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच यावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमण्यात येईल असेही आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले आहे.