राज्यात 20 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अपार्टमेंटमधील फ्लॅट आणि औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन खरेदी करताना भरावे लागणारे मुद्रांकशुल्क 5 टक्क्यांवरून 3 टक्क्यापर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळाच्या गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून कायदा संसदीय कामकाज मंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली.
सरकारने कांही दिवसांपूर्वी शहरातील मालमत्तांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या मालमत्ता करांवर होऊन या करांमध्येही आपोआप वाढ होणार आहे. त्यामुळे सरकारच्या मालमत्ता दरवाढीच्या निर्णयाचा फटका सर्वांनाच विशेष करून सर्वसामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे.
मूल्यांकन वाढ जितकी फायदेशीर तितकीच तोट्याची ठरणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील लहान -मोठ्या आणि सर्व प्रकारच्या मालमत्तांच्या बाबतीत हा प्रकार होणार आहे.
ही बाब कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्यांसह सरसकट सर्वच मालमत्ताधारकांना परवडणारी नाही. त्यामुळे सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता किमान फ्लॅट खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.