वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटी रुपयांचे अनुदान राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली आहे.
वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली होती. या प्राधिकरणासाठी कोणत्याही प्रकारचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी घोषित केले नव्हते. मराठा विकास प्राधिकरणाच्या स्थापनेची घोषणा करत ५० कोटी रुपयांचे अनुदान या प्राधिकरणासाठी जाहीर करण्यात आले होते. परंतु त्यानंतर कन्नड संघटना आणि कन्नड नेत्यांनी मराठा प्राधिकरणाला तीव्र विरोध दर्शविला होता. त्याचप्रमाणे सरकारच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठा विकास प्राधिकरणासहित वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाच्या स्थापनेचीही घोषणा केली. परंतु यावेळी या प्राधिकरणासाठी अनुदान मात्र जाहीर करण्यात आले नव्हते.
कर्नाटकातील एकूण ६ कोटी लोकसंख्येपैकी १ कोटी लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे. या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्राधिकरणाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान विरोधी पक्षाच्यावतीनेही या निर्णयाला विरोध दर्शवून निवडणुकांसाठी सरकार रणनीती आखात असल्याचा आरोप केला होता. संपूर्ण राज्यात यासोबतच सीमाभागात कन्नड संघटनांनी या निर्णयाविरोधात थयथयाट सुरु केला होता. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तातडीने वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. परंतु तरीही कन्नड संघटनांचा रोष हा कमी होत नव्हता. वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेवेळी मुख्यमंत्र्यांनी अनुदान जाहीर केले नव्हते. मात्र आज अचानक तब्बल ५०० कोटींचे अनुदान मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.