भात कापणी करत असताना आपल्या आईविना हरणाची दोन गोंडस पाडसं एकमेकांशी खेळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याची घटना खानापूर तालुक्यातील मुगळीहाळ येथे सोमवारी घडली.
हरणाची पाडसं ज्या शेतात खेळताना दृष्टीस पडली ते शेत मुगळीहाळ गावातील विद्यानंद बनोशी यांच्या मालकीचे आहे. हरणाच्या पाडसांबद्दल माहिती मिळताच बनोशी यांनी तडक आपल्या शेताकडे धाव घेतली आणि आईविना हुंदडणाऱ्या त्या हरणाच्या पाडसांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतले.
शेतकऱ्यांच्या मते नजीकच्या जंगलातील एखाद्या मादी हरणाने भात शेतामध्ये या दोन पाडसांना जन्म दिला असावा. मात्र मनुष्याची (शेतमजूर) चाहूल लागल्याने ती तेथून नाहीशी झाली असावी.
सोमवारी शेतमजुरांनी त्या पाडसांना त्यांच्या आईकडे सोपविण्यासाठी संबंधित मादी हरणाचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र ती कोठेच आढळून आले नाही. दरम्यान, हरणाची संबंधित दोन्ही चिमुकली गोंडस पाडसं अत्यंत तंदुरुस्त असली तरी मोठी होऊन आत्मनिर्भर होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.