राज्याचे उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी आज मंगळवारी आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांचे आज मंगळवारी सकाळी बेळगांव विमानतळावर आगमन झाले आगमनानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या मंत्रीमहोदयांनी त्यानंतर शहरातील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कॉलेज आणि सरदार शाळा आवारातील महिलांच्या पदवी महाविद्यालयासह विविध महाविद्यालयांना भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके व इतर उपस्थित होते. शिक्षण मंत्री डॉ अश्वथ नारायण यांनी महाविद्यालयांच्या भेटीप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला. तसेच कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षणमंत्री डॉ नारायण यांनी महाविद्यालयांना दिलेल्या भेटी संदर्भात आमदार ॲड. अनिल बेनके यांनी पत्रकारांना माहिती दिली. संगोळ्ळी रायन्ना कॉलेजसाठी जागेची समस्या आहे.
त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कॉलेजसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. दोघांनीही विनंती मान्य केली असून येत्या कांही दिवसात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नवी भव्य इमारत उपलब्ध होईल, असे आमदार बेनके यांनी सांगितले.