लष्करी अधिकारी असल्याचे भासवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने तब्बल ५ जणींशी लग्न केले असून पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखविले आहे. त्याचप्रमाणे शहिद जवानांच्या पत्नीचीही याने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या तोतया लष्करी अधिकाऱ्याला कॅम्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
लष्करी गणवेश परिधान करून कॅम्प परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या या भामट्याला पकडून लष्कराने कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याचे बिंग बाहेर पडले. तोतया लष्करी अधिकाऱ्याचे नाव मंजुनाथ बिरादार असे असून तो विजापूर जिल्ह्यातील नालवतवाड गावातील आहे.
लष्करात सुभेदार मेजरपदी असल्याची बतावणी करून त्याने तब्ब्ल पाच जणींशी लग्न केले आहे. यासोबतच दहापेक्षा अधिक शहिद जवानांच्या पत्नींना वन रँक पेन्शन देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. अनेक तरुणांना लष्करात नोकरी लावतो म्हणून हजारो रुपये आपण घेतल्याचे त्याने पोलीस चौकशीदरम्यान कबुल केले आहे.
या भामट्याने अनेक ठिकाणी असे उपद्व्याप केले असून एखाद्या गावात जाऊन लष्करी गणवेशात रुबाब मारून अनेक गावातील मान्यवर मंडळींची भेट घेऊन आपण अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्यावर छाप पाडली. तर कधी मी अनाथ आहे असे सांगून मला लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगायचे. अशापद्धतीने सहानुभूती मिळवून त्याच गावातील मुलीशी लग्न करून महिनाभर सासुरवाडीत पाहुणचार घ्यायचा आणि अचानक गायब व्हायचा. तर गावातील शहिद कुटुंबाचा जाहीर सत्कार करून त्यांच्याशी ओळख वाढवून वन रँक पेन्शन मिळवून देण्याचे आमिष दाखवायचे.
अशापद्धतीने त्याने जवळपास दहा शहीद जवानांच्या पत्नींकडून पैसे उकळले आहेत. अनेक तरुणांना सैन्यात नोकरी मिळवून देण्याचे सांगून पैसे उकळले आहेत. सध्या कॅम्प पोलीस या तोतया लष्करी अधिकाऱ्याची कसून चौकशी करत असून हे प्रकरण त्याच्या गणवेशावरून बाहेर आल्याचे समजते आहे. गणवेश घालून कॅम्प भागात फिरताना हि बाब लक्षात आली आणि त्यानंतर कॅम्प पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले.