शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील एका खाजगी मालमत्तेचे नूतनीकरण करणाच्या कामाच्या ठिकाणी साचणारा मातीचा गाळ व्हॅक्सीन डेपो परिसरात टाकण्यात येत आहे. त्यामुळे येथील ग्लास हाऊस परिसरात चिखलाच्या दलदलीचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे संबंधित प्रकाराला तात्काळ आळा घालावा अशी मागणी सकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे.
शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील खाजगी संपत्तीत नव्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे या ठिकाणची जमीन पाणथळ असल्यामुळे बांधकामाच्या तळ भागात मोठ्याप्रमाणात मातीचा गाळ साचत आहे.
सदर गाळ व्हॅक्सीन टेम्पो येथील क्लास हाऊस परिसरात आणून टाकला जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात टाकण्यात येणाऱ्या मातीच्या गाळामुळे या भागात चिखलाची दलदल निर्माण झाली आहे.
परिसर चिखलाने बरबटलेला असल्यामुळे या परिसरात वावरणाऱ्या विशेष करून या भागात सकाळी व सायंकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याप्रमाणे कला मंदिर जवळील खाजगी जागेमधील मातीचा टाकाऊ गाळ व्हॅक्सिन डेपो सारख्या सरकारी जागेत का टाकला जात आहे? असा संतप्त सवालही केला जात आहे.
तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन ग्लास हाऊस परिसरात मातीचा गाळ टाकण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.