कोरोना पर्वाला सुरुवात झाल्यापासून सर्वसामान्य आजारांवर उपचार मिळणे मुश्किल झाले होते. परंतु तब्बल आठ महिन्यांनंतर जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य आजारांवरील सेवा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती बीम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी दिली आहे. या बातमीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हि दिलासादायक बातमी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून सर्वसामान्य आजारावरील उपचार न मिळाल्याने अनेक नागरिकांचे उपचाराअभावी हाल होत होते. अनेकवेळा अनेक संस्था, संघटनांनी जिल्हाधिकारी तसेच रुग्णालय प्रशासनाकडे यासंबंधी निवेदन देऊन मागणी केली होती. परंतु कोरोना रुग्णांचे कारण पुढे करून अपुरी बेड व्यवस्था तसेच इतर रुग्णालयीन व्यवस्थांची कमतरता असल्याचे कारण देत इतर आजारांवरील उपचार करणे बंद होते.
अनेक गरजू नागरिकांचे यादरम्यान खूप हाल झाले होते. खाजगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च न परवडल्याने अनेक रुग्णांचा मृत्यूही यादरम्यान झाला आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटात आहे. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयातील उपचार सेवा पूर्ववत सुरु करण्याचा विचार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असून सोमवार दि. १६ नोव्हेंबर पासून सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा रुग्णालय उपलब्ध असणार आहे.
गेल्या आठवड्यात एका गर्भवती महिलेला उपचारासाठी ताटकळत बसावे लागले होते. संपूर्ण रात्रभर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बसून काढलेल्या या महिलेवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात आले होते. यानंतर सातत्याने अनेक संस्थांच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील सेवा पूर्ववत करण्यासाठी मागणीचा जोर वाढला होता.
या मागणीची दखल घेत बीम्स चे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी रुग्णालय सेवा पूर्ववत सुरु करण्याची माहिती दिली आहे.