मागील आठ ते नऊ महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य आजारांवरील उपचार विभाग बंद ठेवण्यात आला होता. सध्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोनाबाह्य रुग्णांसाठी उपचार विभाग सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाची साफसफाई करण्याचे काम तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर आजपासून सर्वसामान्य आजारांसाठी जिल्हा रुग्णालय खुले करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाह्य रुग्णांची नोंदणी करण्यात येत असून रुग्णांसाठी ७४० बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. यापैकी ५०० बेड हे कोविडबाह्य रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले असून २४० बेड्स हे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
अत्यावश्यक रुग्णांसाठी याआधीच उपचार सुरु करण्यात आले असून सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी आज रीतसर जिल्हा रुग्णालय दाखल झाले आहे. आयुष्यमान भारत आरोग्य योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णांना नोंदणीकृत रुग्णालयात जाण्यासाठी सुचविण्यात येत असून जनतेने याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविड मुळे अनेक रुग्णांचे उपचाराअभावी हाल होत होते. संपूर्ण जिल्हा रुग्णालय कोविड वॉर्ड मध्ये रूपांतरित झाल्यामुळे सर्वसामान्य आजारांवरील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात प्रवेश मिळणेही मुश्किल झाले होते. कोविड परिस्थिती इतकी भयावह होती, कि या रुग्णालयाच्या आसपासचा भागही सील करण्यात आला होता. इतकेच नाही तर कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांच्या स्वतंत्र कक्षही बनविण्यात आला होता. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असून जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान हवामानात बदल होत असल्यामुळे थंडी वाढत चालली आहे.
यामुळे सर्दी, खोकला आणि सामान्य ताप असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. खाजगी रुग्णालयातील खर्च प्रत्येकाला परवडणारा नाही. यासाठी अनेक संस्था, संघटनांकडून जिल्हा रुग्णालयातील ओपीडी विभाग सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.