सीमाभागातील मराठी जनतेला या ना त्या कारणाने सातत्याने दुजाभावाची वागणूक देण्यात येते. लोकशाही मार्गाने आपला प्रत्येक लढा लढणाऱ्या मराठी माणसाला नेहमीच दडपशाहीमुळे त्रास सहन करावा लागतो. त्यातच भर म्हणून सीमाभागात असणाऱ्या कन्नड संघटना. कोणत्याही कारणासाठी मराठी भाषिकांवर रोष दाखवून समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न या कन्नड संघटनांकडून केला जातो. राजकारण असो वा समाजकारण कन्नड संघटनांच्या अनेक मराठी द्वेष्ट्या नेत्यांची कोल्हेकुई सुरूच असते.
दिवाळीच्या मुहूर्तावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मराठा विकास प्राधिकरण स्थापनेची घोषणा केली होती. यासाठी ५० कोटीची तरतूद केल्याचेही जाहीर केले. दरम्यान या घोषणेच्या काही तासांच्या आताच कन्नड संघटनांच्या नेत्यांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. मराठा विकास प्राधिकरण अमान्य असल्याचे सांगत हे प्राधिकरण रद्द करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. परंतु अर्धवट माहिती आणि ज्ञानामुळे नेहमीच अशा माकडचेष्टा करणाऱ्या कानडी नेत्यांनी आणि कन्नड संघटनांनी मराठा आणि मराठी यातील फरक समजून घेण्याची गरज आहे.
मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या घोषणेनंतर कन्नड संघटनांचा विरोध पुढे येऊ लागला. दरम्यान या गोष्टीला भाषिक वादाचा रंग देत आणि राजकीय वादाचे वळण देत मुख्य उद्देश दूर सारत असल्याचे निदर्शनास येत आहे. सीमाभागातील मराठी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीनेही या प्राधिकरणाबाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संपूर्ण कर्नाटकाच्या सुमारे ६ कोटी लोकसंख्येपैकी १ कोटी लोकसंख्या हि मराठा समाजाची आहे. आणि या १ कोटी लोकसंख्येतील सुमारे २५ लाख मराठा समाजाची लोकसंख्या हि सीमाभागात आहे. यासोबतच दक्षिण कर्नाटकात मराठा समाजातील लोकांची संख्या अधिक आहे. समाज जरी मराठा असला तरी मराठा समाजातील अनेक लोक हे बहुभाषिक आहेत. याप्रमाणेच मराठा समाजाव्यतिरिक्त अनेक समाजातील लोक हे मराठी भाषिक आहेत, याचेही भान या कन्नड संघटनेच्या नेत्यांना नाही.
मराठा विकास प्राधिकरण हे भाषेसाठी स्थापन करण्यात येत नसून मराठा समाजातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत आहेत. संपूर्ण कर्नाटकात मराठा समाजातील अनेक लोक हे कन्नड भाषकही आणि कन्नडसह इतर भाषा बोलणारेही आहेत. परंतु मराठी दुराभिमानी नेत्यांना याची माहिती नाही. ‘अर्धवट ज्ञानाने आणि मराठी विरोधी पोतिडीकीने’ ग्रासलेल्या, आणि स्वतःला प्रकाशझोतात आणण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधाला विरोध करणाऱ्या कन्नड संघटनेच्या नेत्यांच्या बुद्धिमत्तेत या प्राधिकरणाच्या उद्देशाबद्दलचा तिळमात्र लवलेश नाही. केवळ सीमाभागात नाही तर संपूर्ण कर्नाटकातील मराठा समाजाला या प्राधिकरणामुळे फायदा होणार आहे. त्यामुळे सततची कोल्हेकुई बाजूला ठेवून वस्तुस्थितीकडे डोळसपणे पाहण्याची गरज कन्नड संघटनांच्या नेत्यांवर येऊन ठेपली आहे.