देसुर गांवचे सुपुत्र तेजस विलास रेडेकर यांची भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. देसुर (ता. बेळगांव) सारख्या ग्रामीण भागातील या तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा जो मान मिळाला त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
भारतीय लष्करात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवगर्जना स्पोर्ट्स ग्रुपतर्फे अध्यक्ष व्यंकट पाटील व संतोष मरगळे यांच्या हस्ते तेजस रेडेकर यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवगर्जना स्पोर्ट्स ग्रुपचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
भारतीय लष्करात दाखल होण्यासाठी परिसरातील तरुण धडपडत आहेत. देशसेवेचे व्रत उराशी बाळगून अनेक तरुण लष्करात भरती होत असतात. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील तरुण जिद्दीच्या जोरावर लष्करात मोठे यश मिळवू शकतात हे तेजस रेडेकर यांनी दाखवून दिले आहे. मूळचे दड्डी (ता. हुक्केरी) येथील शुभांगी व विलास रेडेकर यांचे चिरंजीव असणारे तेजस रेडेकर हे हे गेल्या दहा वर्षापासून आपल्या आई-वडिलांसोबत देसूर येथे स्थायिक झाले आहेत.
तेजस यांचे शालेय शिक्षण प्रारंभी पहिली ते दुसरीपर्यंत देसूर सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये आणि इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण व्ही. एम. शानभाग शाळेत झाले आहे. त्यानंतर जी.एस.एस. कॉलेजमधून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी संपादन केली. कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी असणाऱ्या तेजस यांची अंतिम वर्षात “उत्कृष्ट विद्यार्थी” म्हणून निवड झाली होती. कॉलेजच्या अंतिम वर्षात असतानाच त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
तेजस यांनी युनियन पब्लिक सर्व्हिसेस कमिशन (यूपीएससी) आणि कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षा दिल्या. त्यानंतर सर्व्हिसेस सेलेक्शन बोर्ड (एसएसबी) या पाच दिवसांच्या मुलाखतीतून निवड झाल्यानंतर ऑल इंडिया रँकिंगमध्ये ते 95 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन थेट “लेफ्टनंट” या लष्करी अधिकारी पदासाठी निवडले गेले.
लेफ्टनंट पदावर रुजू होण्यासाठी तेजस रेडेकर हे येत्या 15 डिसेंबर 2020 पासून चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए चेन्नई) येथे रुजू होणार आहेत. उपरोक्त यशाबद्दल तेजस रेडेकर यांचे देसूर आणि दड्डी परिसरात मोठ्या कौतुकासह अभिनंदन होत आहे.
देसुर गावचा मराठी माध्यमातून शिकलेला युवक बनला लेफ्टनंट-काय आहे त्याच्या यशाचं गमक-पहा बेळगाव Live वर
#tejasredekar
#lieutenant
#belgaumyouthota
#livebelgaum
https://www.facebook.com/375504746140458/posts/1256251824732408/