शहरातील गजबजलेल्या नरगुंदकर भावे चौक परिसरात सार्वजनिक टॉयलेट नसल्यामुळे मोठी गैरसोय होत असून याठिकाणी तात्काळ सार्वजनिक स्मार्ट टॉयलेट (मुतारी) बांधण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह व्यापारी व भाजी विक्रेत्यांनी केली आहे.
शहराच्या मुख्य बाजारपेठेतील नरगुंदकर भावे चौक हा अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. तथापि याठिकाणी सार्वजनिक टॉयलेटची सोय नसल्यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह व्यापारी आणि भाजीविक्रेत्यांची विशेष करून महिलावर्गाची मोठी गैरसोय व कुचंबणा होत आहे.
या परिसरात कांदा मार्केट येथे हे सार्वजनिक टॉयलेट असली तरी त्याची व्यवस्थित देखभाल केली जात नसल्यामुळे त्याचा फारसा वापर होत नाही.
नरगुंदकर भावे चौकानजीकच्या आनंद भवनच्या मागील बाजूस पूर्वी एक सार्वजनिक टॉयलेट होते. मात्र अलीकडच्या काळात ते पाडण्यात आले आहे. देशपांडे गल्लीमधील टॉयलेटची अवस्था कांदा मार्केटमधील टॉयलेट प्रमाणेच झालेली आहे.
नरगुंदकर भावे चौकात गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक टॉयलेट नाही शिवाय आसपासचा टॉयलेट्सची वरीलप्रमाणे अवस्था झाली असल्यामुळे चौकातील व्यापारी आणि भाजीविक्रेत्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची विशेष करून महिलावर्गाची मोठी गैरसोय होत आहे.
तेंव्हा लोकप्रतिनिधी आणि बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नरगुंदकर भावे चौक येथे युद्धपातळीवर स्मार्ट टॉयलेट बांधून देण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.