नैसर्गिक संकटं आणि सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्यामुळे खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावातील बेघर झालेल्या गरीब शेतकरी कुटुंबांसाठी सरकारने आश्रय घरे मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
बेघर झाल्यामुळे रस्त्यावर आलेल्या हिरेहट्टीहोळी (ता.खानापूर) गावातील शेतकऱ्यांनी उपरोक्त मागणी केली असून तशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यासंदर्भात बोलताना शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी म्हणाले की, नैसर्गिक संकटं आणि सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्यामुळे हिरेहट्टीहोळी गांवातील सुमारे 100 शेतकरी कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
आत्तापर्यंत हे सर्वजण रस्त्यावर, देवस्थान परिसरात अथवा भाड्याच्या घरात दिवस कंठत होते. आता भाडे थकल्यामुळे घर मालकांनी त्यांना घराबाहेर काढले आहे, तसेच मंदीरं व देवस्थाने खुली झाल्यामुळे तेथून देखील त्यांना हुसकवण्यात आले आहे. परिणामी या सर्व असहाय्य शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबीयांसमवेत निराश्रिताचे जीवन जगावे लागत आहे. त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकार्यांना भेटण्यास आलो आहोत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निरनिराळ्या विकास योजना राबविण्यापेक्षा सर्वप्रथम नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करावी.
बेघर झालेल्या शेतकऱ्यांच्या निवासाची सोय करावी. खास त्यांच्यासाठी आश्रय योजना राबविली गेली पाहिजे. जिल्हा पालकमंत्र्यांनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिरेहट्टीहोळी येथील शेतकऱ्यांसाठी आश्रय घरांची सोय करावी, असे पुजारी म्हणाले. याप्रसंगी हिरेहट्टीहोळी शेतकरी स्त्री पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.