तोंडावर आलेला दिवाळी सण आणि लग्नसराईच्या हंगामाची सुरुवात होणार असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे गोव्यातील नागरिकांची बेळगांव शहरांमधील बाजारपेठ, दुकाने आणि शोरूम्समध्ये गर्दी होऊ लागली आहे. परिणामी शहरातील व्यापार सध्या तेजीत सुरू आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण बेळगांव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात घटलेली संख्या व्यापारीवर्गाचा उत्साह द्विगुणित करणारी ठरली आहे.
गेल्या शनिवारपासून दरवर्षीप्रमाणे गोवेकरांनी खरेदीसाठी आपला मोर्चा बेळगांव शहराकडे वळविला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि शोरूम्स पुन्हा ग्राहकांनी गजबजून गेल्याचे पहावयास मिळत आहे. गोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी दाखल होत असल्यामुळे तब्बल 8 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर बाजारपेठेत खरेदीला उधाण आले आहे. परिणामी व्यापारी आणि शोरूम चालकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अनेक गोवन कुटुंबीय मुख्य बाजारपेठ असलेल्या शहरातील खडेबाजार, शहापूरसह अन्य भागात दिवाळीचा सण आणि लग्नसराईसाठी उत्साहात खरेदी करताना दिसत आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर शोरुम चालक सॅनीटायझेशन वगैरे आवश्यक खबरदारी घेत असून प्रत्येक ग्राहकाला टेंपरेचर स्क्रीनींग करूनच शोरूममध्ये प्रवेश दिला जात आहे. त्याचप्रमाणे शोरूममध्ये मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
आमचा धंदा हा मोठ्या प्रमाणात गोव्याच्या ग्राहकांवर अवलंबून असतो आणि लाॅक डॉऊनमुळे आमच्या धंद्याचे मोठे नुकसान झाले असून धंद्याचा जम पूर्ववत बसण्यासाठी आम्ही प्रदीर्घ प्रतीक्षा केली आहे. हा काळ आमच्यासाठी अत्यंत क्लेशदायक आणि कठीण होता, अशी प्रतिक्रिया “अंबिका क्लॉथ स्टोअर” शहापूरचे परमानंद गुलाबानी यांनी व्यक्त केली.
परंतु गेल्या आठवड्यात अखेरपासून बेळगांवला भेट देणाऱ्या गोव्याच्या नागरिकांमध्ये अचानक प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत निराशाजनक वाटणारी परिस्थिती आता आशादायक वाटू लागली असल्याचेही गुलाबानी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे खडेबाजार येथील “रेनबो सारीज” या प्रसिद्ध शोरूमचे चालक रमेश धोंगडी यांनी गोव्यातील लोकांच्या आगमनामुळे व्यापारीवर्ग खूश झाला असल्याचे सांगितले.