सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र एका ठिकाणी अगदी वेगळी दिवाळी साजरी केली गेली. ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही आणि गेलं तरी आनंद व्यक्त केला जाता नाही. ही आहे बेळगाव शहरातील एक अनोखी दिवाळी.
स्मशान भूमीत प्रवेश करणारं प्रत्येक मन हे थोडंतरी बिथरतंच. कारण या ठिकाणी कोणी आनंद व्यक्त करण्यासाठी जातं नाही. आणि म्हणूनच इथला कर्मचारीही स्वत:च्या आयुष्यात कितीही आनंदी असला तरी रोज तो दुस-याच्या दु:खासाठी जगत असतो. मात्र सदाशिवनगर स्मशानभूमीत काही काळ आनंदाचं वातावरण दिसून आलं, निमित्त होतं ते जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन या संस्थेच्या वतीने स्मशान भूमीतील कर्मचा-यांसाठी दिवाळी साजरी करण्याचं.
गेली पस्तीस वर्षे वेगवेगळे उपक्रम राबवणा-या या संस्थेच्यावतीने स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचा-यांना गणवेश वाटप करण्यात आले, यासोबत रोख रक्कम फराळ,साबण, सुगंधित तेल आणि
काही भेटवस्तूंचं वाटपही करण्यात आलं.
माणसाच्या मृत्यूनंतर ज्या ठिकाणी केवळ चिता जळते..त्या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचं काम जायंट्स मेनने केलं
कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष संजय पाटील, विशेष कमिटी सदस्य मोहन कारेकर, युनिट संचालक मदन बामणे, मनपाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर श्रवणकुमार कांबळे, धारवाडकर, माजी अध्यक्ष सुनिल भोसले,प्रेमानंद गुरव,सचिव विजय बनसुर,उपाध्यक्ष सुनिल मुतगेकर, दिगंबर किल्लेकर उपस्थित होते.
सर्वच मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.यावेळी श्रवनकुमार कांबळे, धारवाडकर, संजय पाटील,मोहन कारेकर,मदन बामणे,प्रेमानंद गुरव यांनी आपले विचार व्यक्त करताना कोव्हीड काळात रोज पंचवीस ते तीस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.शेवटी कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली