बेळगावच्या राजकारणातील सध्या बहुचर्चित असणाऱ्या डीसीसी बँकेच्या निवडणुका उद्या पार पडणार आहेत. याआधीच १३ जागा बिनविरोध निवडण्यात आल्या असून केवळ ३ जागांसाठी उद्या मतदान होणार असून ही लढत चांगलीच चुरशीची ठरणार आहे.
खानापूर तालुका पीकेपीएस, रामदुर्ग तालुका पीकेपीएस, आणि विणकर सहकारी क्षेत्रासाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीत खानापूर पीकेपीएस साठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार अरविंद पाटील आणि विद्यमान आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्यात जोरदार लढत होणार आहे.
बेळगावच्या राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या डीसीसी बँकेतील निवडणुका सध्या भाजप विरोधात काँग्रेस अशा पद्धतीने होत असून समर्थ मतदारांना गुप्तठिकाणी ठेवल्याचीही बातमी पुढे आली होती.
त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत कोण बाजी मारेल याकडे सहकार क्षेत्र, राजकीय वर्तुळातील प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे.
उद्या सकाळी ९ वाजता या मतदानाला सुरुवात होणार असून सायंकाळी ४ वाजता शहरातील बी. के. मॉडेल हायस्कुल मध्ये मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत बहुचर्चित निंबाळकर वर्सेस पाटील लढत पाहणे रोमांचक ठरणार असून उद्या सायंकाळी ४ पर्यंत जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.