कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होण्यास होत असलेला विलंब आणि एकंदर अनिश्चितता लक्षात घेऊन प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने यंदा विद्यार्थ्यांना सायकली न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुढील वर्षी सायकली दिल्या जातील असेही सूतोवाच केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाने शैक्षणिक क्षेत्रात अनेक प्रश्न व समस्या निर्माण केल्या आहेत. सध्या शाळा सुरू होण्यास विलंब झालाच आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल देऊन सरकारचा हेतू साध्य होणार नाही, असे शिक्षण खात्याला वाटते.
मुख्य म्हणजे सायकली घेण्यासाठी निविदा काढाव्या लागणार असून ही प्रक्रिया किमान तीन महिने चालते. तोपर्यंत शैक्षणिक वर्ष जवळजवळ संपत आलेली असते. त्यामुळे यंदा सायकली न देता पुढील शैक्षणिक वर्षात आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याबाबत सरकार विचार करत आहे.
विद्यार्थ्यांना शाळेत येणे सुकर ठरावे व त्यांना वाहनांसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, या हेतूने सरकारने 2006 -07 सालापासून सायकली देण्यास प्रारंभ केला.
मात्र यंदा प्रथमच सरकारच्या या योजनेला खीळ बसली आहे. यापूर्वी कांही कारणास्तव सायकली देण्यास विलंब झाला होता. तथापि सायकली देणे थांबवले नव्हते. यंदा मात्र सर्वच परिस्थिती अनिश्चित असल्याने हा निर्णय सरकारला घ्यावा लागला आहे.