उत्तर कर्नाटकातील मस्की आणि बसवकल्याण या दोन विभागाच्या पोटनिवडणूक होणार आहेत. या पोटनिवडणूकांची तारीख अजून निश्चित झाली नाही परंतु राजकीय पातळीवर जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार कंबर कसली असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हेलिकॉप्टरमधून प्रयाण केले आहे.
पक्ष संघटन आणि पक्ष बळकटीसाठी तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काँग्रेस युद्धपातळीवर कार्य करत असून कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करण्यासाठी सतीश जारकीहोळी यांनी स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून उत्तर कर्नाटकात झेप घेतली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास सतीश जारकीहोळी यांच्यासह पक्ष कार्यकर्त्यांमध्ये बळावला आहे.
बेळगावमधून कल्याण कर्नाटकाच्या प्रवासासाठी आपल्या हेलिकॉप्टर मधून झेपावणाऱ्या सतीश जारकीहोळीच्या या उड्डाणाची चर्चा आज मोठ्या प्रमाणात रंगली आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराला ठामपणे बहुमताने निवडून आणण्याचा मानस जारकीहोळींचा आहे. काँग्रेस राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी याआधीच काँग्रेसच्या उमेदवारांसाठी कसरत सुरु केली असून आज अचानक सतीश जारकीहोळींच्या या प्रवासामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
याआधीही कर्नाटकातील अनेक निवडणुकांच्या प्रचारासाठी केपीसीसी कार्याध्यक्षांनी आपला सहभाग दर्शविला आहे. पक्ष संघटना आणि निवडणुकीच्या रणनीतीची रूपरेषा ठरविण्यासाठी तसेच पक्ष बळकटीसाठी जोरदार प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. येत्या पोटनिवडणुकीत हि लढत चुरशीची होणार आणि तोडीस तोड टक्कर होणार हे मात्र नक्की आहे.
सतीश जारकीहोळी यांच्यासमवेत विवेक जत्ती, प्रकाश डांगे, जिल्हा एस्टीसेल अध्यक्ष प्रशांत गुड्डकार उपस्थित होते.