बिजगुप्पी (ता. रामदुर्ग) गावातील जगद्गुरु संत श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून जी विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय बसव दल आणि लिंगायत धर्म महासभा बेळगांव जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांच्या नांवे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रीय बसव दल आणि आणि लिंगायत धर्म महासभा बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज मंगळवारी सकाळी प. पू. श्री प्रभुलिंग स्वामीजींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले. गेल्या शनिवारी काही समाजकंटकांनी बिजगुप्पी (ता. रामदुर्ग) गावातील जगद्गुरु संत श्री बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना केली.
लिंगायत समाजाचे दैवत असलेल्या जगद्गुरु बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा हा प्रकार अत्यंत निंद्य आणि निषेधार्ह आहे. यामुळे समस्त लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तेंव्हा विटंबनेच्या सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित समाजकंटकांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रीय बसवत दलाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष के. बसवराज, सेक्रेटरी आनंद गुडस, उपाध्यक्ष अशोक भेंडीगिरी, लिंगायत धर्म महासभेचे जिल्हाध्यक्ष महांतेश गुडस, उपाध्यक्ष मारय्या गडगली आदींसह बिजगुप्पी गावातील बरेच नागरिक उपस्थित होते.