तब्बल 8 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज मंगळवारपासून बेळगांवसह राज्यातील इंजिनीअरिंग, डिप्लोमा व पदवी महाविद्यालयं सुरू झाली आहेत. तथापि कोविड चांचणीच्या सक्तीमुळे आज पहिल्याच दिवशी बहुतांशी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा दुष्काळ दिसून आला, तर कोविड चांचणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पालक व विद्यार्थ्यांची गर्दी पहावयास मिळाले.
कोरोना व त्यानंतरच्या लाॅक डाऊनमुळे राज्यातील महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार आजपासून राज्यातील संबंधित महाविद्यालयं सुरू झाली आहेत. राज्यसरकारने महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी त्यातही अडथळा आहे.
कोरोना चाचणी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जावा असा आदेश काढण्यात आला आहे. यामुळेच आज पहिल्या दिवशी ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयसह शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी कमी होती. विद्यार्थ्यांच्या दुष्काळामुळे संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी आज सकाळपासून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करताना दिसत होते.
सरकारच्या आदेशामुळे कोरोना चांचणीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांची सध्या धावपळ सुरू आहे. गोविंड चाचणी प्रमाणपत्रा शिवाय महाविद्यालयात प्रवेश दिला जात नसल्यामुळे आज मंगळवारी दिवसभर सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड चांचणी विभागासमोर पालक व विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, विविध महाविद्यालयांतर्फे ऑफलाईन व ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात येणार आहेत.
तथापी कोविड चांचणी प्रमाणपत्र केवळ ऑफलाइन क्लास अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. महाविद्यालयातील कर्मचारी व प्राध्यापकांची कोविड चांचणी पूर्ण झाली असून आता संबंधित महाविद्यालयात एकाच वेळी विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. त्याकरिता नगर आरोग्य केंद्राचे कर्मचारी महाविद्यालयात कार्यरत आहेत.