पुढील तीन वर्षांसाठी येडियुराप्पाच मुख्यमंत्रीच राहतील, यासंदर्भात कोणीही आग लावण्याचे कारस्थान करू नका, असा इशारा जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कळसा-भांडुरा प्रकल्पासंदर्भात आयोजित महत्वपूर्ण बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री बी. एस. येडुयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालीच पुढील निवडणुकाही पार पडतील, आणि पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी येडियुराप्पाच मुख्यमंत्री असतील, असे ते म्हणाले.
बेळगावच्या विभाजनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. बेळगावचे विभाजन झालेच पाहिजे. चिकोडी, गोकाक हे जिल्ह्यामध्ये परिवर्तित झाले पाहिजे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाला आपला पाठिंबा असून अनेक कन्नड संघटनांचा यासाठी विरोध आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहागात आज कळसा भांडुरा प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी उच्च्स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हादई पाणी प्रश्नी त्यांनी खुलासा केला. म्हादईचे पाणी चोरल्याचा आरोप कर्नाटकावर करण्यात आला असून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा आरोप केला आहे. कर्नाटकाने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. बेकायदेशीर रित्या पाणी घेण्याचा संबंधच नाही. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे सिद्ध करून दाखवावे, यासाठी मी त्यांना आव्हान देतो. कायद्याच्या चौकटीत राहूनच कर्नाटकाने या पाणीप्रश्नी सर्व कामकाज केले आहे. यासंदर्भात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. न्यायालय याबाबतीत उघडपणे कोणतीही गोष्ट सांगणे शक्य नाही. शिवाय गोव्यात म्हादई प्रश्नी राजकारण होत असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला.
सध्याच्या कोविड परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, कि जिल्ह्यातील कोविड परिस्थिती आता नियंत्रणात असून जनतेने कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपापल्या कामाला लागावे. त्याचप्रमाणे काँग्रेसमधून काहीजण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, यासंदर्भात बोलताना जारकीहोळी म्हणाले कि कृष्णा अनगोळकर यांनी राजीनामा देणे अपेक्षित नव्हते. ते राजीनामा देतील, याचीही कल्पना आपल्याला नव्हती. आपल्यासोबत जिल्हा पंचायतीतीतील एकूण ४३ सदस्यांपैकी २२ सदस्य आहेत, असे जारकीहोळीनंनी स्पष्ट केले.
मंत्री मंडळ विस्ताराबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे. मंत्री मंडळाचा विस्तार लवकरात लवकर करण्याचा आपला विचार आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात येत आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी विशेष परवानगी दिली तर मंत्रिमंडळाचा विस्तार नक्कीच होईल. इच्छुक आणि पात्र असलेल्यांना मंत्रिमंडळात नक्की स्थान दिले जाईल, असे रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.