आरोग्य विभाग आणि तांत्रिक सल्ला समितीच्या अहवालाच्या आधारे डिसेंबरच्या अखेरपर्यंत शाळा – महाविद्यालये सुरु होणार नाहीत, अशी महत्वपूर्ण घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली आहे.
विधानसौधमध्ये मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली आज शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, बीबीएमपी, ग्रामविकास विभाग, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोग्य आणि तांत्रिक विभागाच्या समितीच्या अहवालावर बराच वेळ चर्चा करण्यात आली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोविड १९ ची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने विचार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने व्यवस्था करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असून तांत्रिक सल्ला समिती आणि आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन शाळा सुरु करायची की नाही यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.