प्रभावी आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल बेळगांव शहराचे पोलिस उपायुक्त विक्रम आमटे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश अक्की यांना शुक्रवारी बेंगलोर येथे प्रतिष्ठेचे “मुख्यमंत्री पदक” देऊन गौरविण्यात आले आहे.
बेंगलोर येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित एका खास समारंभामध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या हस्ते बेळगांवचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रम आमटे व पोलीस आयुक्त कार्यालयातील हेड कॉन्स्टेबल रमेश अक्की यांना मुख्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
विक्रम आमटे यांनी बेळगांवमधील आपल्या गेल्या 4 महिन्याच्या कारकिर्दीत कर्तव्यदक्षतेच्या जोरावर आपला असा वेगळा ठसा उमटवला आहे. या चार महिन्यात त्यांनी अवैध प्रकारांविरुद्ध अनेक बेधडक कारवाया केल्या आहेत.
विक्रम आमटे यांनी पोलीस उपायुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बेळगांव पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे अवैध प्रकार करणाऱ्या गुन्हेगारांवर जरब निर्माण झाली आहे. पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांचे आतापर्यंतचे एकंदर उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
विक्रम आमटे हे मूळचे बेळगांव जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी यापूर्वी म्हैसूर गुप्तचर विभागामध्ये काम केले आहे. म्हैसूर आणि मंगळूर येथील पोलिस दलात सेवा बजावल्यानंतर आमटे यांची बेळगांवला बदली झाली आहे.
बेळगांव सारख्या कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवरील संवेदनशील शहरात अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विक्रम आमटे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आपले कर्तव्य अत्यंत कुशलतेने पार पाडले आहे. मुख्यमंत्री पदक मिळाल्याबद्दल पोलीस दलासह सर्वत्र विक्रम आमटे यांचे अभिनंदन केले जात आहे.