कोरोना वॉर्ड म्हणून कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयात एका गर्भवती महिलेला रात्रभर ताटकळत ठेवून उपचारासाठी नकार देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खानापूर तालुक्यातील घोटगळी या गावातील मनीषा दीपक कुंभार हि महिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री हजर झाली. परंतु रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार करण्यात येत नसून इतर कोणत्याही खाजगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून सुचविण्यात आले.
यावेळी जिल्हा रुग्णालयाचे विनय दास्तीकोप यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. यावेळी यांच्याकडूनही कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असून जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेवर उपचार करण्याची सुविधा नसल्याचे सांगण्यात आले.
वडगाव येथील खाजगी रुग्णालयात याआधी त्यांनी धाव घेतली परंतु उपचाराचा खर्च हा आवाक्याबाहेर असल्याने या महिलेला ताटकळत रहावे लागले. घराची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे हा खर्च आपल्याला झेपणारा नाही. यासंदर्भात फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांनी संबंधितांकडून माहिती घेतली.
आणि या महिलेची अडचण लक्षात घेऊन शनिवार खुट येथील नवजीवन हॉस्पिटलचे सतीश चौलीगार यांना संपर्क साधला. या डॉक्टरांनी तातडीने या महिलेला आपल्या रुग्णालयात दाखल करून पुढील उपचार सुरु केले.
खाजगी रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेतच. परंतु जिल्हा प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारा असा रुग्णालयाचा खर्च येत असून, रुग्णालयांच्यावतीने विनाकारण पैसे उकळण्याचे काम सुरु आहे. याबाबतीत नागरीकातून नाराजी व्यक्त होत आहे. याशिवाय अशा रुग्णालयावर कारवाई करण्याचीहि मागणी होत आहे.