शास्त्रीनगर परिसरात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने या भागातील लोकांना भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील गटारी व कचऱ्याची उचल करण्यात येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता व गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी होत आहे.
महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. परिणामी आता या परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
परिसरातील नाल्याची योग्य प्रकारे स्वच्छता न झाल्याने डासांची पैदास वाढली आहे व रस्त्याशेजारी वाढलेल्या झाडिवर, गटारीत व परिसरातील घाण पाण्याच्या ठिकाणी औषधाची फवारणी करणे गरजेचे होते पण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे आपल्या विभागात योग्य प्रकारे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातल्या या मध्यवर्ती भागातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहेत. तसेच जनतेनेही नाल्यात व गटारीत कचरा न टाकता घंटागाडीकडे द्यावा तसेच आपापल्या शेजारी कचऱ्याचे ढीग न ठेवता नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला त्वरीत कळवावे जेणेकरून परिसर स्वच्छ राहिल व लोक निरोगी राहतील, असे मत जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या या परिसरात डासांचा फैलाव अधिक प्रमाणात वाढल्याने भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.