बेळगांव महानगरपालिकेच्या पर्यावरण अधिकाऱ्यांनी कार्यतप्तरता दाखवून शास्त्रीनगर येथील तुंबलेली ड्रेनेज लाईन व चेंबरची सफाई करून दिल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
ड्रेनेज लाईन व चेंबर तुंबल्याने शास्त्रीनगर येथील नागरिकांचे दैनंदिन जीवनचक्र अलीकडे बिघडले होते. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन व चेंबरमुळे आजूबाजूंच्या घरगुती विहिरींचे पाणी दुषित झाले होते.
यात भर म्हणून शहरातील पिण्याच्या पाण्याचे 4/5 दिवस वितरण झाले नसल्याने नागरिकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याचप्रमाणे डासांचा प्रादुर्भाव वाढून जनतेच्या आरोग्य धोका होऊ नये यासाठी राहुल पाटील यांनी नागरिकांनातर्फे बेळगांव महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी आदिलखान आणि आरोग्य विभागाच्या शिवानंद भोसले, विजय जाधव व ईसय्या यांच्यासमोर शास्त्रीनगरमधील जनतेची समस्या मांडली.
तेंव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना कामाला लावून सकिंग मशीन व इतर सहाय्यक साधनासह ताबडतोब 2 दिवसांत तुंबलेली ड्रेनेज लाईन व चेंबर स्वच्छ मोकळा करून दिला.
यावेळी परिसरातील माई पाटील, अमित कदम, हर्षा पटेल, मंगेश हबिब, विश्वनाथ गावडे, शीतल कदम, प्रमोद पाटील, सापळे, संजय पाटील, जोतीबा चौगुले, भवरलाल चौधरी, वेर्णेकर, नम्रता चौगुले, नारायण माळवदे, शुभम चौगुले असे प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.