बेळगांवसह मिरज, रायबाग, कुडची, गोकाक, घटप्रभा येथील प्रवाशांच्या सोयीसाठी लाॅक डाऊनमुळे बंद असलेली कोल्हापूर -बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे लवकरात लवकर पुनश्च सुरू करावी, अशी मागणी सिटीझन्स कौन्सिल्स बेळगांवतर्फे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.
सिटिझन्स कौन्सिल बेळगांवचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन बेळगांव रेल्वे स्टेशनचे चीफ ऑफ कमर्शियल ट्रॅफिक मॅनेजर अनिलकुमार यांना सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून अनिलकुमार यांनी पुढील कार्यवाहीसाठी ते निवेदन त्वरेने केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. लॉक डाऊनमुळे पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणारी कोल्हापूर -बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे गेल्या 7 महिन्यापासून बंद आहे. बेळगांव विभागातून जाणारी ही महत्त्वाची रेल्वे बंद झाल्यामुळे बेळगांवसह मिरज, रायबाग, कुडची, गोकाक, घटप्रभा आदी भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
1940 साली एम. जी. कंपनीने पुणे -बेंगलोर मार्गावर प्रवासी रेल्वे सुरू केली होती. याच रेल्वेचे परिवर्तन मिरज -बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस या रेल्वेमध्ये करण्यात आले. त्यानंतर 2002 साली ही रेल्वे कोल्हापूर येथून सुरू करण्यात आली. सध्या बेळगांव ते मिरज मार्गावर सकाळची रेल्वे उपलब्ध नसल्यामुळे नोकरदारांचे हाल होत आहेत.
त्यामुळे चन्नम्मा एक्सप्रेस ही रेल्वे सुरू झाल्यास त्यांच्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. बेळगांवहून रात्री 9 नंतर पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध नाही. यासाठी हुबळी -मुंबई या मार्गावर रेल्वे सुरू झाल्यास हुबळी येथून ही रेल्वे सायंकाळी 6.30 वाजता निघून बेळगांवला रात्री 9 वाजता पोहोचेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता पुण्याला पोहोचेल.
लॉक डाऊनमुळे चन्नम्मा एक्सप्रेस बंद असल्यामुळे सध्या कोल्हापूर -बेंगलोर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेळगांवपर्यंत पोहोचून बेंगलोरच्या दिशेने रेल्वे प्रवास करावा लागत आहे. राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्यास संबंधित भागातील सर्वच प्रवाशांची चांगली सोय होण्याबरोबरच त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे हे लक्षात घेऊन राणी चन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी, अशा आशयाचा तपशील सिटिझन्स कौन्सिलच्या निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवळी सतीश तेंडुलकर यांच्यासह सेवांतीलाल शाह आणि अरुण कुलकर्णी उपस्थित होते.