विविध रोग निदान चांचण्यांसाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणे जितकी महागडी असतात तितकीच ती उपकरणे वापरणारी मंडळीदेखील अनुभवी असावी लागतात आणि या सुविधा बहुतांश वेळा फक्त मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुरत्या मर्यादित असतात. तथापि जय भारत फाउंडेशनच्या सहकार्याने बेळगांव कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने सर्वसामान्यांसाठी कांही पॅथॉलॉजिकल टेस्ट्स अर्थात रोग निदान चांचण्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध केल्या आहेत.
काही रोगांच्या चांचण्या ठराविक कालावधीच्या अंतराने सातत्यपूर्णरित्या कराव्या लागतात. यासाठी लोकांना खाजगी हॉस्पिटल अथवा प्रयोग शाळांवर अवलंबून राहावे लागते. त्याचप्रमाणे यासाठी बराच पैसा देखील खर्च होत असतो. परंतु आता अशा पद्धतीच्या चांचण्या शहराच्या मध्यवर्ती भागात हेड पोस्ट ऑफिस रोड, कॅम्प येथे असणाऱ्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये हे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बेळगांव कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील या विविध वैद्यकीय सुविधांचे उद्घाटन शनिवारी पार पडले.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी म्हणाले की, कोणत्याही वैद्यकीय उपचारांमध्ये हे रोग निदान महत्त्वाचे असते. रोगाचे निदान झाले तरच परिणामकारक उपचार करता येतात. परंतु रोग निदानासाठी कराव्या लागणाऱ्या चांचण्या खर्चिक असल्यामुळे अनेकांना त्या परवडत नाहीत. यासाठीच आम्ही कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या सहकार्याने सर्वसामान्यांना परवडेल अशा माफक दरात विविध रोग निदान चांचण्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे कमी खर्चात सहजगत्या रोग निदान होऊन रुग्णावर वेळेवर आणि चांगले उपचार होऊ शकतील.
कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्चस्वा यांनी आपले समयोचित विचार व्यक्त करताना कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागात नवी आधुनिक उपकरणे बसविणे हे गरीब गरजू लोकांना माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उचललेले पाऊल असल्याचे सांगितले. तसेच ही आधु निक उपकरणे देणगीदाखल दिल्याबद्दल त्यांनी जयंत हुंबरवाडी यांचे आभार मानले.
उद्घाटन समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी उपस्थित होते. त्याचप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा सौ. निरंजना अष्टेकर, सदस्य साजिद शेख, आरएमओ डाॅ. अनगोळ यांच्यासह सह कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अन्य सदस्य व कर्मचारी टाळूकर, सतीश मन्नूरकर, सामाजिक कार्यकर्ते किरण निपाणीकर, जय भारत फाऊंडेशनचे सीएसआर ऑफिसर नितिष वेर्णेकर आदींसह हॉस्पिटलचे कर्मचारी हजर होते.