के.पी.सी.सी.च्या आदेशानुसार बेळगांव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची निवड पुढील आठवड्यात केली जाणार आहे. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली पुढील आठवड्यात आयोजित सभेमध्ये ही निवड केली जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे बेळगांव लोकसभा पोट निवडणूक उमेदवार निवड समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांनी दिली.
शहरातील काँग्रेस भवनमध्ये आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पाटील यांनी उपरोक्त माहिती दिली. ते म्हणाले की, निवड समितीने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात माहिती गोळा केली आहे. सध्या सात-आठ जण काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांशी आज चर्चा करण्यात आली आहे. समाजातील सर्व समुदायातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अर्ज आलेले आहेत असे सांगून या अर्जांवर विचार करून पुढील आठवड्यात काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असेल यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, असे एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.
बेळगांव लोकसभा पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगाव लोकसभेचे खासदारपद रिक्त झाले आहे. त्यासाठीच ही पोट निवडणूक घेतली जाणार आहे. आता काँग्रेस पक्षाकडून पुढील आठवड्यात त्यांचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे.
दरम्यान भाजपकडून देखील योग्य -लायक उमेदवारासाठी चाचपणी केली जात आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी द्यायची की अन्य कोणाला? याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुढील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बेळगांवला येत आहेत. त्यांच्या भेटीनंतर भाजपच्या उमेदवाराचे नांव निश्चित होण्याची शक्यता आहे. एकंदर पुढील आठवड्यात भाजप किंवा काँग्रेसचा उमेदवार जाहीर होणार हे निश्चित आहे.