बेळगाथव लोकसभा पोट निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे कोणाला तिकीट द्यायचे? यासंदर्भात येत्या शनिवार 21 नोव्हेंबर रोजी बेळगांवमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे.
बेळगांव लोकसभा मतदार संघासाठी कोणाला तिकीट द्यायचे? हे निश्चित करण्यासाठी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार व माजी मंत्री एम. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीची बैठक येत्या 21 नोव्हेंबर रोजी शहरातील काँग्रेस भवनमध्ये होणार आहे. आमदार सतीश जारकीहोळी हे या समितीचे संयोजक असणार असून एल. हनुमंतय्या, वीरकुमार पाटील, श्रीनिवास माने, अजयकुमार सरनायक, अनिल लाड, जी. एस. पाटील, बसवराज शिवण्णावर, नागराज छब्बी आदी मंडळी या समितीचे सदस्य आहेत.
बेळगांव लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील अनेक जण इच्छुक आहेत. तथापि अद्यापपर्यंत कोणीही तिकिटासाठी अर्ज केलेला नाही.
माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्यासह चन्नराज हट्टीहोळी, सुनील हणमण्णावर, विनय नावलगट्टी आदी बरेच जण काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. एकंदर हालचाली लक्षात घेता पोटनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेस उमेदवाराच्या नांवाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.