आज बेळगावमध्ये जवळपास ३९ केंद्रांवर एसआरपीसी / आयआरपीसी आणि केएसआरपी या पुरुष आणि महिला कॉन्स्टेबल पदासाठी सीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेदरम्यान चार बोगस उमेदवार परीक्षा देत असल्याचे निदर्शनास आले असून या चारही जणांना अटक करण्यात आली आहे.
उद्यमबाग येथील जीआयटी कॉलेज, माळमारुती येथील लव्ह डेल सेंट्रल स्कुल, टिळकवाडी येथील के. एस. एस. इंग्लिश प्रायमरी, प्री-प्रायमरी आणि हायस्कुल तसेच शहापूरमधील सरकारी चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालय अशा चार ठिकाणाहून चार बोगस उमेदवारांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोकाक तालुक्यातील हडगिनाळ येथील भीमाशी हल्लोळी (वय २४), चिणचीनमरडी येथील सुरेश कडबी (वय २५), उदगट्टी येथील आनंद वडेयर (वय २८) आणि मेहबूब अक्कीवाट (वय २३) यांचा समावेश आहे. हे चारही आरोपी गोकाक तालुक्यातील असून या आरोपींवर उद्यमबाग, माळमारुती, टिळकवाडी आणि शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस विभागाच्या रिक्त पदासाठी सुरु असलेल्या सीईटी परीक्षेत अशाप्रकारे उमेदवार अदलाबदली करण्याच्या प्रकारावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकूण ११९२१ उमेदवारांपैकी ८४६१ उमेदवार आज परीक्षेला हजर होते.