बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातील मोठा जिल्हा आहे. १८ विधानसभा क्षेत्र, १४ तालुके, असणाऱ्या या जिल्ह्याचे नव्याने विभाजन होण्याची गरज असल्याची चर्चा राजकीय मंडळींकडून पुढे येत आहे.
आज काँग्रेसभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी जिल्ह्याचे विभाजन होण्याची चर्चा छेडली होती. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होण्याची मागणी कित्येक वर्षे करण्यात येत आहे. परंतु आजवर जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले नाही. १८ लोकसभा मतक्षेत्र असणाऱ्या धारवाड जिल्ह्याचे तीन जिल्ह्यात विभाजन झाले परंतु इतका मोठा जिल्हा असूनही बेळगावचे विभाजन अजूनपर्यंत झाले नाही, ते होणे गरजेचे असल्याचे वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले होते.
बेळगावमधील सीमाप्रश्नाचा वाद हा सर्वश्रुत आहे. या सीमाप्रश्नाला अनुसरून बेळगाव जिल्ह्याचे लवकरात लवकर विभाजन होणे आवश्यक असल्याची मागणी अनेक कन्नड संघटनांकडूनही करण्यात येत आहे. यासाठी आंदोलनेही छेडण्यात आली आहेत. जे. एच. पटेल हे मुख्यमंत्री असल्यापासून ही मागणी करण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यात भाषावाद हा प्रखर आहे.
परंतु सध्या या भाषावादासाठी लढत असलेली महाराष्ट्र एकीकरण समितीही थंडावली असल्याची टीका जारकीहोळी यांनी केली. सीमाभागात सध्या महाराष्ट्र एकीकरण समिती संपूर्ण कंगाल झाली आहे. बेळगाव जिल्ह्याची व्याप्ती पाहता जिल्ह्याचे विभाजन होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. एकंदर या वक्तव्यामुळे बळ्ळारी नंतर बेळगावचे विभाजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.