राज्याचे यंदाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षीप्रमाणे बेळगावमध्ये भरविण्यात ऐवजी बेंगलोर विधानसभामध्ये आयोजित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे बेळगांव सुवर्ण विधानसौधमध्ये दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची परंपरा पुन्हा एकदा खंडित होणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत येत्या 7 ते 15 डिसेंबर दरम्यान आयोजित केले जाणारे राज्याचे हिवाळी अधिवेशन बेंगलोरमध्येच घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या या बैठकीस राज्यातील निवडक महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. अल्पावधीत आटोपती घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनासह मराठा विकास प्राधिकरण आणि वीरशैव लिंगायत विकास प्राधिकरण यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हिवाळी अधिवेशनात संदर्भातील आपल्या निर्णयाद्वारे बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भाजप सरकारने बेळगांव सुवर्ण विधानसौधमधील हिवाळी अधिवेशन आयोजनाची परंपरा यंदा खंडित केली आहे.
बेळगांवात सुवर्ण विधानसौध इमारतीची उभारणी झाल्यापासून दरवर्षी राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन याठिकाणी भरविले जात होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील मंत्री आणि लोकप्रतिनिधींची बेळगावला पायधूळ लागत होती.
दरवर्षी बेळगांवात होणारे हे अधिवेशन कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत होते. तथापि राज्य सरकारच्या निर्णयामुळे यावेळी बेळगांवची सुवर्ण विधानसौध इमारत हिवाळी अधिवेशनापासून वंचित राहणार आहे.