चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी बेळगांव पोलीस आयुक्तालयाकडून रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून रात्री 12 ते पहाटे 4 च्या दरम्यान रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांसह नागरिकांची चौकशी करून तपासणी केली जात आहे. याचा गैरफायदा घेऊन रात्री 11.30 वाजताच एका दुचाकीस्वाराला डोक्यावरील हेल्मेट काढायला भाग पडून त्याचे छायाचित्र घेऊन अरेरावी केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, एक दुचाकीस्वार काल रात्री 11.30 वाजता हेल्मेट आणि मास्क परिधान करून घरी परतत असताना आरपीडी क्रॉस, टिळकवाडी येथे पोलिसांनी त्याला अडवले. सध्या रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत पोलीस चौकशी करत असले तरी संबंधित दुचाकीस्वाराला विनाकारण अडविण्यात आले. तसेच कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी त्याला हेल्मेट काढायला लावले. त्यानंतर गाडीसह दुचाकीस्वाराचा फोटो घेतला. त्या दुचाकीस्वाराने आपल्याला काढण्यात आले असा जाब विचारला असता रात्री जे फिरतायत त्यांची चौकशी केली जात आहे, असे सांगण्यात आले.
तेंव्हा त्या दुचाकीस्वाराने ही चौकशी व तपासणी
तर रात्री 12 ते सकाळी 4 पर्यंत केली जात आहे, असे सांगितले. तेंव्हा, आता वेळ बदलून रात्रीची 11 करण्यात आली आहे असे तो पोलीस म्हणाला. बरं ते ठीक आहे परंतु तुम्ही माझा फोटो का काढलात? असा सवाल त्या दुचाकीस्वाराने केला. त्यावर त्या निर्वाढलेल्या पोलीसाने आम्हाला पण पोटापाण्याचा बघावं लागत असे निर्लज्ज उत्तर दिले. आपल्याला देण्यात आलेल्या या त्रासाची फोटोसह माहिती संबंधित दुचाकीस्वाराने कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्तांना दिली आहे.
तथापि घडलेल्या प्रकारामुळे सध्या संबंधित दुचाकीस्वार हेल्मेट परिधान केलं नाही म्हणून पोलीस खात्याकडून आपल्याला नोटीस तर पाठवली जाणार नाही ना? या विचाराने चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान, नागरिक कायदा आणि नियम पाळून पोलीस खात्याला सहकार्य करत असताना अशाप्रकारे सर्वसामान्य लोकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या संबंधित पोलिसांना समज द्यावी अशी मागणी केली जात आहे.