मुलांना त्यांच्या लहान वयापासूनच गडकिल्ल्यांच्या माध्यमातून हिंदू धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत व्हावा. यासाठी दिवाळीमध्ये शिवकालीन गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा त्यांचा उत्साह अधिक वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “बेळगाव लाईव्ह” आणि जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या संयुक्त विद्यमाने शहराच्या दक्षिण भागातील प्रत्येक किल्ल्याच्या प्रतिकृतिसाठी मुलांना स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी झाला.
आज कालच्या बालचमूला गडकोट आणि किल्ल्यांच्या या माध्यमातून हिंदू धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत व्हावा. यासाठी दिवाळीमध्ये शिवकालीन गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्याचा त्यांचा उत्साह अधिक वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने “बेळगाव लाईव्ह” आणि जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविणाऱ्या शहराच्या दक्षिण भागातील प्रत्येक किल्ल्याच्या प्रतिकृतिसाठी मुलांना स्मृतिचिन्ह व रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ काल मंगळवारपासून झाला असून जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी काल महाद्वार रोड व शहापूरसह पिरनवाडी येथे बाल चमूने ठिकठिकाणी बनविलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीना भेट देऊन संबंधित मुलांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे कौतुक केले. येत्या कांही दिवसात या पद्धतीने उर्वरित ठिकठिकाणच्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींना भेटी देऊन मुलांना प्रोत्साहित केले जाणार आहे.
जि. पं. सदस्य गोरल यांनी काल मंगळवारी सायंकाळी रयत गल्ली, पिरनवाडी येथील मुलांनी बनविलेल्या सिंहगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला भेट देऊन बालचमूचे कौतुक करण्याबरोबरच आपल्या भेटीचा उद्देश स्पष्ट केला. तसेच पालकवर्गाने आपल्या मुलांना शिवकालीन इतिहास समजण्यासाठी आणि तो जतन करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले.
बेळगाव शहरातील भांदुर गल्ली, महाद्वार रोड, नार्वेकर गल्ली शहापूर,नाथ पै सर्कल आणि पिरनवाडी भागांतील किल्ल्याना भेटी देऊन गौरविण्यात आले
रयत गल्ली येथील बाल चमूने सिंहगड अर्थात कोंढाणा किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनवली असून किल्ल्यामध्ये सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, किल्ल्यावर रक्षण करणारे त्यांचे मावळे, तोफा ठेवण्यात आल्या आहेत. किल्ल्याचा सुरक्षित भाग, प्रवेशद्वार, भवानीमातेचे मंदिर, तलाव आदी किल्ल्याची ठळक वैशिष्ट्ये प्रतिकृतीमध्ये दाखविण्यात आली आहेत. एका बालिकेने उपस्थित पाहुण्यांना किल्ल्याची माहिती दिली.
सिंहगड प्रतिकृतीची पाहणी करून जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी मुलांचे कौतुक तर केलेच शिवाय त्यांना स्मृतिचिन्ह आणि बक्षीस देऊन प्रोत्साहित देखील केले. याप्रसंगी गल्लीतील नागरिकांसह पिरनवाडी गावातील युवक मंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.