टोपलीत बंदिस्त नाग सापाच्या जीवावर मिळालेल्या पैशातून चैनी करणाऱ्या मद्यपी गारुड्याला एका सामाजिक कार्यकर्त्याने वनरक्षकाच्या मदतीने रंगेहात पकडून त्याच्याकडील नागाची सुटका केल्याची घटना आज सकाळी शहरातील कसाई गल्ली कॉर्नरनजीक घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज सकाळी आपल्या टोपलीतील नागसाप दाखवून लोकांकडून दक्षिणेच्या स्वरूपात मिळालेले पैसे घेऊन एक गारुडी दुकानात दारू पीत बसला. सीबीटी टॅक्सी स्टँड कसाई गल्ली कॉर्नर नजीकच्या एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या या मद्यपी गारुड्याला सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि वनरक्षक श्रीनाथ देसाई यांनी दक्षिणा म्हणून मिळालेल्या पैशातून दारू पिताना रंगेहात पकडले.
त्यानंतर त्याला वनखात्याच्या कार्यालयात घेऊन जाण्यात आले. तिथे वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्या मद्यपी गारुड्याच्या टोपलीत बंदिस्त असलेल्या नाग सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपल्या ताब्यात घेतले.
वनखात्याकडून केल्या गेलेल्या या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी प्रशंसोद्गार काढून समाधान व्यक्त केले. तसेच ताब्यात घेतलेल्या गारुड्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणीही केली.
दरम्यान, उपरोक्त कारवाई म्हणजे जनतेला एक संदेश आहे की, मुक्या वन्य प्राण्यांना हाताशी धरून पैसे उकळणाऱ्या भंपक लोकांपासून सावध रहावे. तसेच असे लोक आढळल्यास तात्काळ वनखात्याला त्यांची माहिती द्यावी. बंदिस्त प्राण्यांना मुक्त करून त्यांना जीवनदान द्या. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त जगू द्या, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी केले आहे.