Saturday, November 16, 2024

/

शेतकऱ्यांच्या समोर समस्यांचा डोंगर वाढताच!

 belgaum

भारत हा कृषिप्रधान देश असूनही या देशात सर्वात जास्त अडचणींचा सामना हा शेतकऱ्यालाच करावा लागतो. १२ महिने जीवापाड जपल्या जाणाऱ्या उघड्या छताखालील आपल्या काळ्या आईला शेतकरी आपल्या जीवापेक्षाही जास्त जपतो. परंतु शेतकऱ्याच्या समोरील समस्यांचा पाढा हा वाढतच आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ, कधी शेतीमालाला न मिळणार योग्य भाव तर कधी शेतजमीनच बळकावली जाण्याची धास्ती. या सर्वानंतरही निकृष्ट दर्जाचा बियाणे पुरवठा, खतांचा पुरवठा तर कधी रोगांचा प्रादुर्भाव. या समस्यांच्या ओझ्याखाली शेतकरी जगात आहे. बेळगावमधील बेळगाव, शहापूर, येळ्ळूर, वडगाव, धामणे, जूने बेळगाव आणि तालुक्यातील इतर परिसरातील शेतकऱ्यांवर कठीण परिस्थिती ओढवली आहे.

यंदा आलेल्या कोरोना लाटेमुळे पिकाला आधीच योग्य भाव मिळाला नाही. त्यातच पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे अर्धे अधिक पीक कुजून गेले. आणि त्यानंतर उरलेल्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. आणि आता या पाठोपाठच भातपिकाचा दर पडला आहे. 2019 मधे अतिवृष्टी झाली पण हा रोग पडला नव्हता. भाताचा उतार कमी आला; पण क्विंटलला भाव ३२००/३३०० रुपये इतका होता. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी सहानुभूती मिळाली. पण यावर्षी सुरवातीला पाऊस खूप झाला. परंतु हा पाऊस शेतीसाठी उत्तम ठरला. पावसाचे प्रमाण योग्य असल्यामुळे भातपीकं वाचली होती पण ऐन वेळेला करपा रोगाने बेळगाव, शहापूर, येळ्ळूर, वडगाव, धामणे, जूने बेळगाव तसेच परिसरातील शेतकऱ्यांची भातपीकं नष्ट झाल्याने शेतकरी पुरता हैराण झाल्याने शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईसाठी आंदोलनं, निवेदन दिली. नुकसानभरपाई मिळणार अशी आश्वासनही मिळाली. परंतु आजपर्यंत कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही.

सध्या सुगीचा हंगाम जोर धरला असून अनेक शेतकरी भाताची मळणी करण्यात व्यस्त आहेत. जितके पीक शिल्लक आहे, त्या पिकाची विक्री करून निदान यंदाचा आपला खर्च भागविण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. बेळगावमध्ये बासमती भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. इतरवेळी चांगला भाव आणि मागणी असणाऱ्या या पिकाला यंदा केवळ २३००/२४०० रुपये प्रति क्विंटल तर इंद्रायणी १६००/१७०० रुपये प्रति क्विंटल दराने भात खरेदी करण्यात येत आहे. या दरामुळे शेतकरी अजूनच चिंताग्रस्त बनला आहे. यंदा पडलेल्या करपा रोगामुळे शेतकऱ्यांना खाईत लोटले आहे तर पडत्या भावामुळे शेतकऱ्यांची समस्या अधिकच वाढली आहे.

या समस्येवर सरकारने लक्ष घालून पर्याय शोधावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोनामुळे मागील वर्षी खरेदी केलेले भात तसेच पडून आहे. त्यातच आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे यंदा भात खरेदी होण्याची शक्यताही कमी आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या या समस्येवर लक्ष घालून पर्याय शोधून देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.